महाराष्ट्र
राशनकार्ड धारकांसाठी खुशखबर, दुकानात वेळ खर्च करण्याची गरज नाही आता धान्य आल्याची बातमी मिळणार मोबाईल वर…
विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
मुंबई :सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता धान्य रेशन दुकानावर पोहोचताच लाभार्थ्यांना एसएमएस पाठवला जाणार आहे. यामुळे नागरिकांना धान्य आले की नाही हे तपासण्यासाठी दुकानावर वारंवार जाण्याची गरज भासणार नाही.
मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक
रेशन कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानावर जाऊन आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, एकदा मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर प्रत्येक वेळी धान्य दुकानात आल्यानंतर लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती मिळेल.
पालघर जिल्ह्यातील आकडेवारी
पालघर जिल्ह्यात सुमारे ४,३२,०४१ लाभार्थी आहेत. यामध्ये ९७,९५९ लाभार्थी हे अंत्योदय योजनेतील असून उर्वरित ३ लाख लाभार्थी प्राधान्य कुटुंबांतील आहेत. या निर्णयामुळे सर्व लाभार्थ्यांना सुविधा सहज उपलब्ध होणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाचा आदेश
शासकीय गोदामातून धान्य रेशन दुकानाकडे रवाना होताच संबंधित परिसरातील लाभार्थ्यांना तत्काळ एसएमएस पाठवण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.
रेशन वितरण व्यवस्थेतील हा महत्त्वाचा बदल गरजूंना वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने धान्य मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.