
मधुमेह किंवा डायबिटीस हा आयुष्यभर सोबत राहणारा आजार किंवा आरोग्य विषयक समस्या आहे. दरवर्षी सुमारे 10 लाखांहून अधिक लोकांचा यामुळं मृत्यू होतो. हा आजार अगदी कोणालाही होऊ शकतो.
जेव्हा शरिर रक्तातील साखरेचा पूर्णपणे वापर करत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. मधुमेहाच्या दुष्परिणामांमुळं व्यक्तीला हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, अंधत्व, किडणी निकामी होणे किंवा शरिराच्या खालच्या भागातील अवयवांच्या विच्छेदना याचा सामना करावा लागू शकतो.
त्यात ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंदाजे जगभरात 42.2 कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत. 40 वर्षांपूर्वीच्या आकड्यापेक्षा हा आकडा चार पटीनं वाढलेला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे आकडे सांगतात.
एवढे धोके असूनही ज्यांना हा आजार आहे त्यांच्यापैकी निम्म्या लोकांना तरी याबाबत काही माहिती नसते.
मधुमेह कशाने होतो?
जेव्हा आपण काही खात असतो तेव्हा आपलं शरिर कार्बोहायड्रेटचं रुपांतर साखरेमध्ये (ग्लुकोज) करत असतं. नंतर आपल्या स्वादुपिंडामध्ये (पॅनक्रियाज) तयार होणारं इन्सुलिन नावाचं हार्मोन शरिरातील पेशींना ती साखर उर्जेसाठी शोषून घेण्याची सूचना करत असतं.पण जेव्हा इन्सुलिन तयार होत नाही, किंवा ते व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा मधुमेह होतो. कारण त्यामुळं रक्तात साखर जमा व्हायला लागते.
डायबिटीसची लक्षणे काय आहेत?
सर्वसामान्यपणे दिसून येणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- खूप तहान लागणे
नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी
जास्त थकवा जाणवणे
प्रयत्न न करताही वजन कमी होणे
सारखे काही इन्फेक्शन होणे
दृष्टी कमी होणे
कापलेल्या किंवा इतर जखमा लवकर न भरणे
मी मधुमेह टाळू शकतो का?
मधुमेह हा प्रामुख्याने अनुवांशिक आणि पर्यावरणातील घटकांवर अवलंबून असतो. पण आरोग्यदायी आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता.
प्रक्रिया केलेल्या साखरेचे पेय किंवा पदार्थ टाळून आणि पास्ता किंवा व्हाईट ब्रेड ऐवजी धान्य किंवा व्होलमीलचा वापर करणं हे त्यासाठीचं पहिलं आणि चांगलं पाऊल ठरू शकतं.
रिफाइन्ड साखर किंवा रिफाइन्ड धान्यातील पोषक तत्वे कमी असतात. कारण त्यातील तंतूमय किंवा जीवनसत्वं असलेला भाग काढून टाकला जातो. उदाहरण द्यायचं झाल्यास मैदा, व्हाईट ब्रेड, पांढरा भात, पास्ता, पेस्ट्रीज, साखरयुक्त पेये, मिठाई आणि साखर घातलेले नाश्त्याचे पदार्थ.
निरोगी आहारामध्ये भाजीपाला, फळे, कडधान्य, होल ग्रेन यांचा समावेश असतो. तसंच त्यात आरोग्यास फायदेशीर ठरणारे तेल, सुका मेवा आणि ओमेगा 3 नं भरपूर असलेले सार्डीन्स, सालमन असे मासे यांचा समावेश असतो.
तुम्ही काही ठरावीक वेळेनंतर थोडं थोडं खात राहणं आणि पोट भरल्यानंतर खाणं थांबवणं हेही महत्त्वाचं आहे.
व्यायामामुळंही तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. ब्रिटन्स नॅशनल हेल्थ सिस्टिमनं (NHS)दर आठवड्याला किमान अडिच तास अॅक्रोबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात वेगानं चालणे आणि पायऱ्या चढणे यांचाही समावेश आहे.
निरोगी वजन तुमच्या शरिरात साखरेचं प्रमाण कमी ठेवण्याचा मार्ग सुकर करत असतं. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर त्यासाठी हळू हळू प्रयत्न करा. आठवड्याला अर्धा ते एक किलोने वजन कमी करा.
धुम्रपान (स्मोकिंग) टाळणे आणि कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर लक्ष असणे हेदेखिल हृदय विकारांचा धोका टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.
मधुमेहामुळं कोणत्या अडचणी वाढतात?
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास त्यामुळं रक्तवाहिन्यांचंही मोठं नुकसान होऊ शकतं.
जर तुमच्या शरिरात रक्ताचा प्रवाह योग्यप्रकारे होत नसेल तर ते गरजेनुसार तुमच्या शरिरातील अवयवांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं मज्जातंतूचं नुकसान (भावना, वेदना कमी होणं) होतं. तसंच दृष्टी कमी होणे आणि पायाला संसर्ग होणे याचे प्रकारही वाढतात.
अंधत्व, किडणी निकामी होणे, हार्ट अटॅक, पक्षाघात आणि शरिराच्या खालच्या भागातील अवयवांच्या विच्छेदनासाठी मधुमेह हे प्रमुख कारण असल्याचं WHO चं म्हणणं आहे.
2016 मध्ये अंदाजे 16 लाख मृत्यूमागचं थेट कारण हे डायबिटीस होतं.
- डायबिटीस किती लोकांना आहे?
WHO च्या माहितीनुसार डायबिटीस असलेल्यांचा आकडा 1980 मधील 10.8 कोटींवरून वाढून 2014 मध्ये 42.2 कोटींवर पोहोचला.