अहमदाबाद विमान अपघातात 241 प्रवासी मृत्युमुखी पडले, फक्त 1 प्रवासी वाचला….
विशेष प्रतिनिधी

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या अपघातग्रस्त विमानातील सर्व प्रवासी दगावले असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचादेखील समावेश आहे. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. दरम्यान या अपघातामध्ये 1 व्यक्ती वाचल्याचे वृत्त समोर आले आहे. कोण आहे ही व्यक्ती? 241 प्रवासी दगावले असताना ही व्यक्ती कशी वाचली? हा प्रवासी कोणत्या सीटवरुन प्रवास करत होता? असे अनेक प्रश्न विचारले जातायत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हे विमान दिल्लीहून अहमदाबाद व्हाया लंडन असा प्रवास करणार होतं. धक्कादायक बाब म्हणजे उड्डाण करताच अवघ्या 15 किमी अंतरावरच मेघानी रहिवाशी परिसरात विमान कोसळलं आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर आपत्कालीन सेवांवर देखरेख करण्यासाठी चार आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही टीम आरोग्य प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. अपघातस्थळी आणि संबंधित ठिकाणी समन्वित मदत, बचाव आणि वैद्यकीय प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. गांधीनगरहून विमान अपघातस्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 90 जवानांचा समावेश आहे. वडोदराहून आणखी तीन तुकड्या पाठवण्यात येत आहेत.
काय नाव?
रमेश विश्वास कुमार असे या वाचलेल्या प्रवाशाचे नाव असून तो 40 वर्षांचा आहे. अहमदाबादमधील असरवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
कोणत्या सीटवर बसला होता?
अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी वाचलेल्या प्रवाशाची माहिती दिली आहे. पोलिसांना सीट 11ए मध्ये एक जिवंत प्रवासी सापडलाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या संख्येबद्दल अद्याप काहीही सांगता येत नाही. विमान निवासी भागात कोसळल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती पोलिसांनी एएनआयला दिलीय.
क्रू मेम्बर्समध्ये सुनील तटकरेंच्या भाचेसून
एअर इंडियाच्या AI171 विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत. या विमानात महाराष्ट्रातीलही प्रवासी होते. दरम्यान विमान दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातेवाईकाचाही समावेश आहे. अपर्णा महाडिक एअर इंडियाच्या विमानात क्रू मेम्बर होत्या. त्या सुनील तटकरे यांच्या भाचेसून म्हणजेच भाच्याच्या पत्नी आहेत.
नेमकं काय झालं?
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान मेघानी नगरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झालं. हे विमान दिल्लीमधून अहमदाबादला पोहोचलं होतं आणि तेथून लंडनला रवाना होणार होतं. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) नुसार, विमानाने रनवे क्रमांक 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. त्यानंतर, विमानाने ताबडतोब एटीसीला मे डेचा संदेश दिला. या संदेशाचा अर्थ असा की विमानात आपत्कालीन परिस्थिती आहे. यानंतर, एटीसीने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रनवे क्रमांक 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.