आता बच्चू कडूंना घेरण्यासाठी भाजपनं कट्टर विरोधकाच्या माध्यमातून लावली ‘फिल्डिंग’?
अमरावती प्रतिनिधी

- अमरावती प्रतिनिधी : शिवसेनेतील फुटीनंतर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना ‘सपोर्ट’ करत महायुतीत प्रवेश केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार उभा केल्यानं त्यांचं महायुतीसोबत फिस्कटलं. तसेच, लोकसभेला नवनीत राणा यांचा पराभव झाला. तेव्हापासून कडू आणि राणा दाम्पत्यामधील विस्तव जाता-जात नाही. त्यामुळे बच्चू कडू यांना घेरण्यासाठी भाजपकडून ‘फिल्डिंग’ लावल्याचं बोललं जात आहे.
महायुतीत घटक पक्ष असताना बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी नवनीत राणा यांना तिकीट देण्यास विरोध केला होता. मात्र, तरीही भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानं कडू संतापले आणि दिनेश बूब यांच्यामाध्यमातून अमरावती मतदारसंघात उमेदवार उभा केला. दिनेश बूब यांनी या निवडणुकीत 76 हजार मते घेतली. मात्र, नवनीत राणा यांना 20 हजार मतांनी बळवंत वानखेडे यांनी पराभूत केलं.
चारवेळा दर्यापूर अन् अचलपूरमधून विजय…
माजी राज्यमंत्री स्वर्गीय विनायक कोरडे यांचे चिरंजीव प्रमोद कोरडे यांनी अचलपूरमधून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र, त्यांना राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष केलं आहे. त्यामुळे प्रमोद कोरडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. बच्चू कडू हे अचलपूरमधून सलग चारवेळा निवडून आले आहेत. यंदा त्यांनी ‘महाशक्ती’च्या माध्यमातून वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला कशी टक्कर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.